नवी दिल्ली : प्रत्येक कलाकार हा आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी आपला वेळ, ऊर्जा आणि साधनसंपत्तीची गुंतवणूक करत असतो. त्यांच्या कलाकृतींना योग्य मूल्य मिळाले तर कलाकारांना, तसेच कला क्षेत्राला पेशा म्हणून स्वीकारू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. याकरता आर्थिक आणि सांस्कृतिक ताकद म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या ६४ वा राष्ट्रीय कला प्रदर्शन पुरस्कार सोहळ्याला बुधवारी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या सगळ्यांच्या कलाकृती इतर कलाकारांना प्रेरणा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय परंपरेत कलेला खूप पूर्वीपासून एक आध्यात्मिक साधनेचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले. कला ही केवळ सौंदर्याचा अनुभव घेण्याचे माध्यम नसून, ती आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्याचे आणि अधिक संवेदनशील समाज घडवण्याचे एक शक्तिशाली साधन आहे, असे त्या म्हणाल्या. कलाकार त्यांच्या कल्पना, दृष्टीकोन आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून एका नव्या भारताचे चित्र सादर करत आहेत, हे पाहून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ललित कला अकादमी कलाकारांच्या कलाकृतींच्या विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे पाहून आनंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या या पुढाकारामुळे कलाकारांना आर्थिक मदत मिळेल आणि आपल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल ही बाब त्यांनी नमूद केली. कलाप्रेमींनी केवळ कलाकृतींचे कौतुक करू नये, तर त्यांनी त्या घरी विकत घेऊन जाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.