मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : कोस्टल रोड आणि सागरी सेतूमुळे नुकसान होणाऱ्या कोळी बांधवांना नुकसान भरपाई देताना मुंबई महापालिकेच्या निकषाप्रमाणे देण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी आज येथे दिले. वांद्रे वर्सोवा सागरी सेतूमुळे खार दांडा कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचे मासेमारीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, मात्र मुंबई महापालिकेचे निकष आणि शासनाचे निकष यामध्ये तफावत आहे. कोस्टल रोडचा जो टप्पा मुंबई महापालिकेने बांधला त्यासाठी मुंबई महापालिकेने जे निकष तयार केले तेच निकष पुढे शासना ने ग्राह्य धरून खार दांडा पासून वर्सोवा ते भाईंदर पर्यंत जिथपर्यंत कोस्टल रोड जातो तिथपर्यंत या निकषाप्रमाणेच नुकसान भरपाई देण्यात यावी असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
शासनाच्या निकषांप्रमाणे कमी नुकसान भरपाई मिळते तर वरळी सागर सेतूमुळे बाधित झालेल्या कोळी बांधवांना मुंबई महापालिकेच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली. यामुळे कोळी बांधवांनी याबाबत आक्षेप घेऊन उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तक्रार केली होती याबाबत आज मुंबई मेरीटाईम बोर्ड, एम.एस.आर.डी.सी, एम.एम.आर.डी.ए मुंबई महापालिका यांची संयुक्त बैठक मंत्री आशिष शेलार यांनी घेतली आणि या बैठकीमध्ये महापालिकेच्या निकषांचा समावेश करुन शासनाच्या अध्यादेशामध्ये सुधारणा करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.