चंद्रभागे नदीचे पाणी वगळून उत्तरप्रदेशच्या गंगेचं पाणी?
पंढरपुरच्या मंदिर समितीचं चाललंय काय?
समाजसेवक गणेश अंकुशराव यांचा खळबळजनक खुलासा
मंगेश तरोळे-पाटील
मुंबई / पंढरपूर : पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू असुन याची अनेक उदाहरणे आम्ही समोर आणली आहेत. आता तर मंदिर समितीच्या कारभा-यांनी कांही पुरातन परंपरांनाच तिलांजली दिल्याचं उघड झालंय. श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी पवित्रं चंद्रभागेचं पाणी (तिर्थ) वापरण्याऐवजी मंदिर समिती चक्क उत्तर प्रदेश येथून गंगेचं पॅकबंद पाणी वापरत असल्याचं आमच्या निदर्शनास आल्याचा खळबळजनक खुलासा पंढरीतील समाजसेवक, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलाय. गणेश अंकुशराव आज दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी येथे असलेले गंगेचे पॅकबंद पाण्याचे बॅरलच उघडकीस आणले आहेत.
जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा, माझी बहिण चंद्रभागा करीतसे पापभंगा अशा विविध अलंकारित शब्दांद्वारे आमच्या संतांनी आपल्या अभंगातून चंद्रभागेचा महिमा सांगितला आहे. पुर्वी जेंव्हा मंदिरात सेवाधारी होते तेंव्हा विठ्ठल रूक्मिणीमातेच्या अभिषेकासाठी चंद्रभागेचे ताजे पाणी आणले जायचे, परंतू हल्ली मंदिर समितीकडून नवाच पायंडा पाडला जात आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि तातडीने गंगेच्या तिर्थासोबतच चंद्रभागेच्या तिर्थाचा वापर सुध्दा श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी सुरू करावा. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.