शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती; विरोधकांनी आत्मचिंतन करावे – एकनाथ शिंदे

0

मुंबई : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले सवाल उपस्थित करताना त्यातील २० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही केली. त्यामुळे त्यांनी प्रथम आत्मचिंतन केले पाहिजे, स्वतःच्या गिरेबान मध्ये डोकावून पाहिले पाहिजे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आणि धीर देण्याचे काम आम्ही करणार आहोत. केंद्राच्या शेतकरी सन्मान निधी योजनेप्रमाणे राज्यातही महायुती सरकारने सन्मान निधी योजना सुरू केली आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना किती मदत केली, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेलात, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

गेल्या अडीच वर्षांत विविध योजनांतून तीस ते चाळीस हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला गेला आहे, याची आठवण करून देत शिंदे म्हणाले की, आता देखील आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटी-शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय झाला आहे. पुढील दोन दिवसांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कोणीही अंदाज लावत असेल तर तो चुकीचा आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देईल, अशी ग्वाही शिंदेंनी दिली. कोणतीही बँक सक्तीची वसुली करणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांचा अपप्रचार असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “लाडक्या बहिणींनी त्याकडे दुर्लक्ष करावे. आम्ही ही योजना कधीच बंद होऊ देणार नाही. ज्यांनी योजनेला विरोध केला त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. विरोध करणारे दुष्ट व सावत्र भाऊ कोण आहेत, याची माहिती लाडक्या बहिणींना आहे. याची प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आली आहे.”

दहा हजार रुपयांचा धनादेश, अन्नधान्य, कपडे, पुस्तके देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळीमध्ये आलेल्या पूरपरिस्थिती लक्षात घेता एसटीची भाडेवाढ रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीचे परिपत्रक लवकरच काढले जाईल व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech