नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

0

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यभर तीव्र आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी वरोरा येथे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनाला हजारो शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर २.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, जालना, लातूर, वर्धा, रत्नागिरी सह राज्यातील इतर जिल्ह्यात व तालुकास्तरावरही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech