सततच्या पावसामुळे संपूर्ण कोकणपट्टीतील मच्छिमारी ठप्प !

0

मुंबई: जून व जुलै या दोन महिन्यांत शासन नियमांनुसार देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीस बंदी असते. एक ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते. काही दिवस समुद्र शांत असल्याने व हवा पोषक असल्याने मच्छिमारी सुरळीत झाली. पण नारळी पौर्णिमेनंतर पावसाने पुन्हा जोर धरला. गौरी-गणपतीच्या काळात पावसामुळे मच्छिमारी ठप्प झाली. बोटी नांगरून ठेवाव्या लागल्या. काही दिवस मासेमारी झाली खरी, पण नवरात्र सुरू होताच पुन्हा वादळी पाऊस व वारा सुरू झाला. बांगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रावर सुसाट वारा सुटला आणि मच्छिमारीसाठी गेलेल्या बोटी समुद्रात अडकल्या. जीवावर उदार होऊन मच्छीमारांनी नजीकच्या बंदरात आश्रय घेतला.

रत्नागिरीपासून मुरुड, दिघीपर्यंत अनेक बोटी अजूनही बंदरात थांबलेल्या आहेत. वादळ शांत होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणामी, ऑगस्ट-सप्टेंबर हे मच्छिमारीसाठी पोषक महिने असूनही या वर्षी पावसामुळे पूर्णपणे फुकट गेले. डिझेल, बर्फ, जाळी, साहित्य या सर्व खर्चावर पाणी फिरले. या वर्षी अतिरिक्त पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले, त्यांच्या शेतीचा पंचनामा करून शासनाने मदतीची घोषणा केली आहे. पण त्याचबरोबर समुद्रावर आपली शेती करणारे मच्छीमारही सततच्या पावसामुळे आणि वादळामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांचे श्रम, खर्च आणि वेळ वाया गेला आहे. त्यामुळे मच्छिमारांनाही शासनाने सानुग्रह मदतीचा हात दिला पाहिजे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रदीप टपके यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech