नवी मुंबई विमानतळ समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल : पंतप्रधान

0

मुंबई : नवी मुंबईचे प्रदीर्घ स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍यक्‍त केला. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आज, बुधवारी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी मोदी म्हणाले की, मुंबईला आज, दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. हे केवळ विमानतळ नसून विकसित भारताची झलक दाखवणारे प्रवेशद्वार आहे. यामुळे मुंबई लवकरच देशातील सर्वात मोठं कनेक्टिव्हिटी हब बनेल. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर कमळाच्या आकारात बांधले गेले असून, ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. यापूर्वी २०१४ पर्यंत देशात फक्त ७४ विमानतळ होते, मात्र आज त्यांची संख्या १६० वर पोहोचली आहे. आमच्या सरकारने ‘उडाण योजना’ सुरू करून सामान्य माणसालाही हवाई प्रवास परवडण्यासारखा केला. छोट्या शहरांनाही हवाई मार्गाने जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी मविआ सरकारवर निशाणा साधताना म्हटलं, “मविआ सरकारच्या धोरणांमुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. योग्य नियोजन आणि दूरदृष्टी नसल्यामुळे प्रकल्प थांबले, निधी अडवला गेला आणि लोकांना लाभ मिळण्यास विलंब झाला. महाराष्ट्र सरकारने आज अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अशा भविष्यातील महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते प्रेरणादायी असल्याचेही नमूद केले.

अलिकडेच, एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आणि माजी गृहमंत्र्यांनी खुलासा केला आहे की, मुंबईत २००८ मधील हल्ल्यानंतर आमचे सुरक्षा दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, परंतु दुसऱ्या देशाच्या दबावामुळे, त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आमच्या सुरक्षा दलांना थांबवले. काँग्रेसने हे सांगायला हवे की परदेशी शक्तीच्या दबावाखाली हा निर्णय कोणी घेतला ? काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना बळकटी मिळाली. आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्‍पष्‍ट केले. सध्‍याचा भारत हा घरात घुसून मारणारा आहे. नुकतेच भारताने राबवले ऑपरेशन सिंदूर त्‍याचे उदाहरण असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

विमानतळामुळे राज्‍याचा जीडीपी वाढणार :मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असं ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि १५ दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात सरकार आल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आला. केवळ काही तासांमध्ये दहा वर्ष झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीनंतर झाले. आजचा दिवस स्वप्नपूर्तेचा आहे. या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा जिथे हात लागतो तिथे सोनं होतं: एकनाथ शिंदे
आठ वर्षांपूर्वी सर्वात मोठ्या एअर पोर्टचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले होते. आज याचे उद्घाटन होत आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे. २१ व्या शतकात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे स्थान असेल. आता मुंबईची तुला नवी मुंबईशी केली जाईल हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण आहे. हे विकासकाम केवळ आणि केवळ महायुती सरकारच करू शकते. मेट्रो, नवी मुंबई एअर पोर्ट आणला पण काहींनी मधल्या काळात स्पीड ब्रेकर लावला; पण आमचं सरकार आलं आणि काम सुसाट झालं. आज आमचा शेतकरी संकटात आहे. आम्ही पॅकेज जाहीर केलं आहे. जो शब्द आम्ही दिला होता, तो पाळला आहे, असेही त्यांनी सांगितले.

संकट काळात पंतप्रधान महाराष्ट्राला साथ देतील: अजित पवार
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. राज्यात सध्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला साथ देतील. संकटाच्या काळात ते नेहमी महाराष्ट्राला साथ देतात असे त्यांनी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech