पश्चिम बंगाल : वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

0

दुर्गापूर : पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची कडक तपासणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका महिला खासदारावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून तिला जखमी केले होते. आता बंगालमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पश्चिम वर्धमान जिल्ह्यात एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दुर्गापूरमधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसजवळ घडली. दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी तिच्या मित्रासोबत पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर पडली होती. रात्रीच्या अंधारात महाविद्यालयाजवळील एका निर्जन परिसरात विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. पिडीत तरुणी ओडिशाच्या जलेश्वर येथील रहिवासी आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिडीत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमाराला आपल्या मित्रासोबत पाणीपुरी खाण्यासाठी कॉलेज कॅम्पसमधऊन बाहेर पडली होती. त्यावेळी मोटर सायकलवरून आलेल्या या मुलीचे अपहरण केले. तसेच तिला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पिडीतेचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला कॅम्पसच्या बाहेर सोडून दिले. सोबतच या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील पिडीतेला देण्यात आली. आरोपींनी पिडीतेचा मोबाईल फोन परत करण्यासाठी पैसे मागितले. पोलिसांनी पिडीत विद्यार्थीनीची जबानी घेतली आहे.

घटनेची माहिती मिळताच पिडीत विद्यार्थीनीचे पालक ओडिशाहून दुर्गापूरला पोहचले. तिच्या वडिलांनी सांगितले की, “आम्हाला तिच्या मैत्रिणींचा फोन आला आणि घटनेची माहिती मिळाली. आम्ही आज सकाळी येथे आलो आणि पोलिस तक्रार दाखल केली.” शुक्रवारी रात्री एका मित्रासह जेवण्यासाठी कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडली होती तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या आईने केला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक दुर्गापूरला जाणार
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक पीडिता आणि तिच्या पालकांना भेटण्यासाठी दुर्गापूरला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अर्चना मजुमदार म्हणाल्या, “बंगालमध्ये महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिस कोणतीही सक्रिय कारवाई करत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा गुन्ह्यांमध्ये वाढ थांबवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पुढे येण्याची आणि एकत्र काम करण्याची विनंती करेन.” दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य आरोग्य विभागाने शनिवारी दुर्गापूरमधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवाल मागवला आहे. ते पुढे म्हणाले, “आम्ही या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून तात्काळ अहवाल मागवला आहे. आम्ही त्यानुसार कारवाई करू.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech