मविआतील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव वा चर्चा नाही – हर्षवर्धन सपकाळ

0

नवी दिल्ली : मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे. या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष लढा देत आहे. या लढाईत देशभरातील अनेक पक्ष सहभागी होत इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील. राज्यातही भाजपाविरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे, असे सपकाळ म्हणाले.

निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत पण मागील काही निवडणुकांमध्ये घोटाळे करण्यात आले. मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. मतचोरीचा प्रकार राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केला आहे. हाच मुद्दा घेऊन राज्यात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाचे सीईओ एस. चोकलिंगम यांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य निवडणूक आयुक्तांना मविआकडून एक निवेदन सोपवण्यात आले. या निवेदनात महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांचा समावेश होता. तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड उपस्थित होते.

मविआच्या सर्वपक्षीय शिष्टमंडाळाने सादर केलेल्या या निवेदनावर राज ठाकरे यांची छाप दिसून आली. या निवेदनाची सुरुवात ‘सस्नेह जय महाराष्ट्र’, अशी करण्यात आली आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आले आहेत. राज ठाकरे हे मविआच्या नेत्यांसोबत एकत्र येणे महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे मविआसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आघाडी वा युतीचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech