मुंबई : एका बाजूला प्रभास आपल्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे त्याचीच आणखी एक भव्य प्रस्तुती ‘बाहुबली: द एपिक’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांतील निवडक आणि काही कधीही न पाहिलेले सिक्वेन्सेस नव्या रुपात सादर केले जाणार आहेत. ट्रेलर रिलीज होताच ‘बाहुबली’चा नवा अवतार सोशल मीडियावर पसरला आहे. आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘बाहुबली: द एपिक’च्या माध्यमातून दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा माहिष्मतीच्या गौरवशाली साम्राज्यात नेलं आहे. जुन्या चाहत्यांना आठवणींच्या प्रवाहात घेऊन जाणारा हा अनुभव नव्या पिढीला बाहुबलीच्या महागाथेचं नवं दर्शन घडवत आहे. प्रेक्षकांच्या मते, ट्रेलरने ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’मधील महत्त्वाच्या घटनांना अत्यंत प्रभावीपणे एकत्र बांधलं आहे.
चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ट्रेलर शेअर करताना लिहिण्यात आलं की, “२ चित्रपट, एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव! सादर आहे एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली: द एपिक’.” हा महाकाव्य चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल ३ तास ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ या दोन्ही चित्रपटांच्या ऐतिहासिक यशानंतर राजामौली यांनी या नव्या प्रस्तुतीला फ्रँचायझीच्या १० व्या वर्धापन दिनाचा उत्सव म्हटलं आहे. १० जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांनी जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर ‘बाहुबली २’ने तब्बल १८०० कोटी रुपयांची कमाई करत भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी नोंदवले.