उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग

0

मुंबई : नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या अ‍ॅमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. त्यांच्या सोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे.

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘बिन लग्नाची गोष्ट’ आपल्या आजूबाजूच्या नात्यांचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास हे या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो.“ निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “ हा चित्रपट नात्यांच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणारा आहे. आजच्या पिढीचे आयुष्य, त्यांची नात्यांकडे पाहाण्याची दृष्टी, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडले आहे. चित्रपटगृहानंतर ओटीटीवर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे.”

गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech