नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय राजकारणातील वंशवादावर गंभीर टीका केली आहे. ‘इंडियन पॉलिटीक्स आर अ फॅमिली बिसनेस’ या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात थरूर यांनी अनेक उदाहरणे देताना भारतीय राजकारण कुणाची कौटुंबिक मालमत्ता नसल्याचा टोला लगावला आहे. भारतीय राजकारणातील वंशवादाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना शरूर म्हणाले की, लोकशाहीचे खरे आश्वासन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा राजकारण काही मोजक्या कुटुंबांची संपत्ती राहणार नाही. भारताला आता वंशपरंपरेच्या ऐवजी योग्यता आणि कर्तृत्वावर आधारित राजकारणाची दिशा घ्यायला हवी. यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांतर्गत लोकशाही बळकट करण्यासाठी कार्यकाळाची मर्यादा ठरवणे आणि पक्षाचे खरे निवडणुका घेणे आवश्यक असल्याचे शशी थरूर म्हणाले. मतदारांनाही आडनाव किंवा कौटुंबिक ओळख न पाहता उमेदवाराची योग्यता आणि जनतेशी नातं पाहायला हवे.त्यांनी म्हटलं, “जेव्हा सत्ता एखाद्याच्या पात्रतेपेक्षा त्याच्या घराण्यावर ठरते, तेव्हा प्रशासनाची गुणवत्ता घसरते असे त्यांनी सांगितले.
थरूर यांनी लिहिले की, ही समस्या फक्त काँग्रेसपुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतीय राजकीय व्यवस्थेत पसरलेली आहे. त्यांच्या मते, जेव्हा एखाद्या उमेदवाराची सर्वात मोठी ओळख त्याचं आडनाव ठरते, तेव्हा टॅलेंट कमी पडतं आणि लोकशाही कमकुवत होते. ओडिशात बीजू पटनायक यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र नवीन पटनायक, महाराष्ट्रात बाल ठाकरेपासून उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे, उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादवपासून अखिलेश यादव, बिहारमध्ये रामविलास पासवानपासून चिराग पासवान, आणि पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादलपासून सुखबीर बादल हीच परंपरा सुरू आहे. , जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. त्यांनी हेही नमूद केले की ही प्रवृत्ती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियात दिसते
पाकिस्तानात भुट्टो आणि शरीफ कुटुंब, बांग्लादेशात शेख आणि जिया कुटुंब, तर श्रीलंकेत डारणायके आणि राजपक्षे कुटुंब. देखील अशाच राजकीय वंशवादाची उदाहरणे आहेत. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत जेव्हा वंशवाद फोफावतो, तेव्हा तो अधिकच विरोधाभासी वाटतो. राजकारणात “कुटुंब” हे एका ब्रँडसारखे काम करते. लोकांना त्या नावावर विश्वास वाटतो आणि ओळख सहज पटते, त्यामुळे असे उमेदवार सहज निवडून येतात अशी खंत थरूर यांनी व्यक्त केली.