संतपीठातील विकासासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता
मुंबई : समाजात संतांच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा प्रसार घडविण्यासाठी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र संतपीठ, पैठण येथील मूलभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र संतपीठ, पैठण येथील मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार विलास भुमरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर, संतपीठाचे संचालक प्रवीण वक्ते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे पाच वर्षासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच संतपीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमासाठी अध्यपक -अध्यपकेत्तर कर्मचारी वेतन खर्चासाठी प्रतिवर्षी १ कोटी देण्यास मान्यतादेण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संतपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन संतपीठाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.