महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुका जाहीर

0

मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडेल. अधिकृत निकाल १० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल.

अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक : उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर अशी मुदत दिली असून, अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर, तर आक्षेप नोंदविलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हवाटप २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. या निवडणुकीत राज्यातील एकूण २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून, यामधून ६,८४९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार आहेत. यंदा १० नवीन नगरपरिषद आणि १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश झाला आहे.

राज्यातील १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार या निवडणुकीत सहभागी होणार असून, १३,३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १३,७२६ कंट्रोल युनिट आणि २७,४५२ बॅलेट युनिटची तयारी करण्यात आली आहे. मतदारांना सुलभतेने माहिती मिळावी म्हणून आयोगाने विशेष मोबाईल अॅप व संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमांतून मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिक स्थितीची माहिती पाहता येणार आहे.

उमेदवारांच्या खर्च मर्यादा : निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आयोगाने खर्च मर्यादेत वाढ केली आहे. अ वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष: ₹१५ लाख, सदस्य: ₹५ लाख, ब वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष: ₹११.२५ लाख, सदस्य: ₹३.५० लाख, क वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष: ₹७.५० लाख, सदस्य: ₹२.५० लाख, नगरपंचायत – अध्यक्ष: ₹६ लाख, सदस्य: ₹२.२५ लाख

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे पालघरपासून गडचिरोलीपर्यंत सर्व जिल्ह्यांतील नगरपरिषद व नगरपंचायतींचा समावेश या निवडणुकीत आहे. मुंबई व काही महानगरपालिकांशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील नागरी भागात लोकशाहीचा हा उत्सव रंगणार आहे. राज्यभरातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आपापल्या तयारीला वेग दिला असून, स्थानिक पातळीवर प्रचारयंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुका राज्याच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech