आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार….!

0

सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

(अनंत नलावडे)

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, पुरस्थिती, अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे हजारो शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेले तांदूळ, भाजीपाला, फळबागा, ऊस, सोयाबीन, कापूस यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तर शेतातील पीकच नव्हे तर जनावरांचे चारा, घरांची साधनं आणि अन्नधान्य सुद्धा वाहून गेले.अनेक शेतकरी आजही आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना राज्य सरकारकडून मदत प्रक्रिया सुरु आहे.

परंतु या कठीण काळात, शेतकऱ्यांच्या दु:खाला स्पर्श करून त्यांच्या मदतीला धावून जाण्याचा एक आदर्शवत उपक्रम महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील आमदारांचे स्वीय सहाय्यकांनी राबवला आहे. केवळ शासनात काम करण्यापुरते न थांबता सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी जुळवाजुळव करून स्वतःच्या स्तरावर ३,०३,०३०/- (तीन लाख तीन हजार तीस रुपये) इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गोळा केली.ही रक्कम “फुल नाही, फुलाची पाकळी” या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सुपूर्त करण्यात आली. उपस्थित वातावरणात भावनिक ऊर्मी, समाजहिताची भावना आणि एकतेचा संदेश दिसून येत होता.आमदार हे जनतेचे प्रतिनिधी असतात.परंतु, त्या आमदारांच्या पाठीशी उभे राहून विविध कामे,संवाद,समन्वय सांभाळणारे स्वीय सहाय्यक हेही समाजातील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत.याच जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आली.हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, संकटग्रस्त जनतेसोबत उभे राहण्याची मानसिकता आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला आहे.या उपक्रमाची कल्पना सर्व प्रथम बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विलास तरे यांचे स्वीय सहाय्यक एस. मुलाणी यांनी मांडली.त्यांनी सर्व स्वीय सहाय्यकांना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व स्वीय सहाय्यकांनी एकतेचे दर्शन घडवले व संवेदनशीलतेने या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वखुशीने योगदान दिले.दरम्यान उपस्थित स्वीय सहाय्यकांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी आपल्या घामाने देशाची अन्नसुरक्षा जपली आहे.त्यांच्या संकटकाळात आम्हीही काही प्रमाणात मदतीचा हात देणे ही आपली जबाबदारी आहे.”

धनादेश स्वीकृतीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीय सहाय्यकांच्या या संवेदनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक केले आणि म्हणाले की, “आजच्या काळात सरकारी यंत्रणेत काम करणारे तरुण सामाजिक बांधिलकी जपत, स्वतःहून पुढे येतात ही मोठी प्रेरणा आहे.हा उपक्रम समाजातील इतर घटकांसाठीही आदर्श ठरेल.” मुख्यमंत्र्यांनी सर्व स्वीय सहाय्यकांचे अभिनंदन करत पुढेही अशाच सामाजिक कार्यात सहभाग वाढवावा असे आवाहन केले.स्वीय सहाय्यकांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ आजपुरता मर्यादित नसून पुढेही समाजसेवा आणि आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय सहभाग देण्याचा त्यांचा संकल्प आहे.संकटात एकत्र येऊन समाजासाठी काही करण्याची भावना, राज्यातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech