निसार उपग्रह ७ नोव्हेंबरपासून कार्यरत होणार – व्ही. नारायणन

0

गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित चाचणी जानेवारी
बंगळुरू : नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलेला ‘निसार’ उपग्रह शुक्रवारपासून अधिकृतरीत्या कार्यरत (ऑपरेशनल) होणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख व्ही. नारायणन यांनी आज, बुधवारी सांगितले. ‘एमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (इएसटीआयसी)’ या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात इस्त्रो प्रमुख म्हणाले की, नासा–इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार (निसार) हा आजवरचा सर्वात महागडा पृथ्वी निरीक्षण उपग्रह मानला जातो. या उपग्रहात अशी क्षमता आहे की तो दर १२ दिवसांत २ वेळा पृथ्वीवरील बहुतेक भूभाग आणि बर्फाच्छादित प्रदेशांचे निरीक्षण करू शकतो. २४०० किलोग्रॅम वजनाचा निसार उपग्रह ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (एसडीएससी) जीएसएलव्ही रॉकेटद्वारे अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला होता. या उपग्रहाच्या सर्व डेटाची सखोल पडताळणी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी आम्ही या उपग्रहाला औपचारिकरित्या ‘ऑपरेशनल’ घोषित केले जाणार आहे.

निसार मोहिमेची विशेषता म्हणजे ती दोन स्वतंत्र रडार प्रणाली (एल-बँड आणि एस-बँड सेन्सर) एकाचवेळी वापरणारी जगातील पहिली मोहिम आहे. एल-बँड रडार दाट जंगलांच्या छत्राखालील माहिती गोळा करण्यास सक्षम असून, त्याद्वारे मातीतील आर्द्रता, वनस्पतींचे जैवभार (फॉरेस्ट बायोमास) तसेच जमिनी आणि बर्फाच्या पृष्ठभागावरील हालचाली मोजता येतात. तर एस-बँड रडार लहान वनस्पती आणि गवताळ प्रदेशांचे अधिक तपशीलवार निरीक्षण करू शकतो. त्यामुळे तो कृषी भूमी, गवताळ परिसंस्था आणि बर्फातील आर्द्रतेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो. दोन्ही रडार प्रणाली ढगांमधून आणि पावसाळ्यात, दिवस-रात्र कोणत्याही वेळी डेटा संकलन करण्यास सक्षम आहेत. नारायणन म्हणाले की, आतापर्यंत मिळालेला सर्व डेटा उत्कृष्ट आहे. या उपग्रहाच्या साहाय्याने दर १२ दिवसांनी पृथ्वीचे संपूर्ण स्कॅनिंग करता येईल. निसार उपग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल.”

इस्रो प्रमुखांनी पुढे माहिती दिली की, ‘गगनयान’ मोहिमेचे पहिले मानवरहित चाचणी उड्डाण जानेवारी महिन्यात होणार आहे. इस्रोचे उद्दिष्ट आहे की २०२७ पर्यंत भारताचे अंतराळवीर स्वदेशी रॉकेटद्वारे अवकाशात पाठवणे. या मोहिमेसाठी आतापर्यंत ८ हजारांहून अधिक चाचण्या पार पडल्या आहेत. इस्रो प्रथम ३ मानवरहित उड्डाणे पार पाडेल आणि त्यानंतरच अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाईल. त्याचप्रमाणे नारायणन यांनी असेहीही सांगितले की, भारत २०२८ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाचा पहिला मॉड्यूल अवकाशात सोडण्याची योजना आखत आहे, आणि २०३५ पर्यंत सर्व ५ मॉड्यूल पूर्णपणे कार्यरत करण्यात येतील. हे अंतराळ स्थानक ५२ टन वजनाचे असेल, ज्यामध्ये ३ ते ४ अंतराळवीर दीर्घकालीन वास्तव्यासाठी आणि ६ सदस्य अल्पकालीन मोहिमांसाठी राहू शकतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech