पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे सलमान खान विरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई : पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे सलमान खान अडचणीत आला आहे. भाजप नेते आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी सलमान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सलमान खानने माउथ फ्रेशनर ब्रँडची जाहिरात अशा प्रकारे केली आहे की ज्यामुळे तरुणांची दिशाभूल होईल, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली नसून या प्रकरणाची सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तक्रारदार इंदर मोहन सिंग हनी यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, “सलमान खान हा अनेक लोकांसाठी एक आदर्श आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध कोटा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. इतर देशांमध्ये, सेलिब्रिटी किंवा चित्रपट तारे कोल्ड्रिंक्सचे समर्थनही करत नाहीत, परंतु येथे ते तंबाखू आणि पान मसाला सारख्या उत्पादनांचा प्रचार करतात.”

त्यांनी पुढे म्हटले की, पान मसाला बनवणारी कंपनी राजश्री पान मसाला आणि सलमान खान यांनी त्यांच्या उत्पादनात वेलची आणि केशर पान मसाला असल्याचा दावा करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या आहेत. हा दावा खरा असू शकत नाही, कारण केशरची किंमत प्रति किलोग्रॅम अंदाजे ४ लाख रुपये आहे, जी ५ रुपयांच्या उत्पादनात समाविष्ट करता येत नाही. असे खोटे दावे तरुणांना पान मसाला खाण्यास प्रोत्साहित करतात, जे तोंडाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. इंदर मोहन सिंग हनी यांच्या तक्रारीनंतर, कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला नोटीस बजावली आहे आणि त्याच्याकडून उत्तर मागितले असून या प्रकरणाची सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech