राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब फुसकाच, तो फोटो मॉर्फ केल्याचे उघड – फडणवीस

0

नागपूर : राहुल गांधी जेव्हा “हायड्रोजन बॉम्ब” म्हणतात, तेव्हा तो फुसका ठरतो, हे याआधी सिद्ध झाले आहे. काल त्यांनी दाखवलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचे काही माध्यमांनी उघड केले आहे. त्या फोटोतल्या काही मतदारांची ओळख पटवली गेली असून, त्या मतदारांचा शोधही माध्यमांनी घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची ही मोहीम लोकशाहीला डळमळीत करण्याच्या आंतरराष्ट्रीय अजेंड्याशी संबंधित असल्याचा संशय उपस्थित होत आहे. भारताच्या लोकशाहीवर आणि संविधानाने उभारलेल्या संस्थांवर जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे गुरुवारी एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, मला आनंद आहे की ते घराबाहेर पडले आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले होते, तेव्हा त्यांनी खाली उतरून लोकांमध्ये जाण्याचे टाळले होते. आता सततच्या राजकीय पराभवांमुळे त्यांना लोकांमध्ये जाण्याची गरज जाणवू लागली आहे. पण आपणच पाहत आहात की, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जात आहेत, तिथे लोक पाठ फिरवत आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचा दौरा सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकारचे मदत पॅकेज मिळत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी तर लोकांना पकडून त्यांच्या सभांमध्ये आणावे लागत आहे. राज्यात काही ठिकाणी पॅकेजचे पैसे सध्या पोहोचले नसतील, पण दररोज सुमारे ६०० कोटी रुपये आरबीआयच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे हे संपूर्ण पॅकेज प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत दररोज पोहोचत आहे, असे फडणवीस म्हणाले.

पुण्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झालेल्या आरोपांच्या संदर्भात, मी महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग या दोन्हींकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. या चौकशीच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही अधिकृत भूमिका मांडू. प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सर्व माहिती मिळाल्यानंतरच मी या विषयावर सविस्तर भाष्य करेन. शासनाची पुढील दिशा आणि कारवाईबाबत स्पष्ट सांगायचे झाले, तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अशा कोणत्याही गैरप्रकारांना पाठिंबा दिला जाणार नाही. कुठेही अनियमितता झालेली असेल, तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. आमचे महायुती सरकार पारदर्शकतेवर विश्वास ठेवते, त्यामुळे या प्रकरणात अनियमितता आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाईल आणि असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech