भारताने बांगलादेश सीमेवर तीन नवीन लष्करी तळ केले स्थापन

0

नवी दिल्ली : भारतीय सेनेने सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेला अधिक मजबुती देण्यासाठी तीन नवीन लष्करी तळ स्थापन केले आहेत. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार हे तळ बामुनी, किशनगंज आणि चोपडा येथे उभारले गेले आहेत. ही सर्व ठिकाणे बांगलादेश सीमेजवळ असून, सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या परिसरात आहेत.हा निर्णय अलीकडेच पाकिस्तानचे जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या बांगलादेश भेटीनंतर वाढलेल्या सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.

स्रोतांच्या मते, सिलिगुडी कॉरिडॉरची सुरक्षा ही भारतीय सेनेसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. ही तीन नवीन लष्करी तळ कमकुवत भागांची सुरक्षा सुनिश्चित करतील आणि गरज भासल्यास सशस्त्र दलांना नवे रणनीतिक पर्याय उपलब्ध करून देतील. त्याचबरोबर, ईशान्य सीमावर्ती भागातील निरीक्षणक्षमता आणि संकटाच्या वेळी सेनेची तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता देखील वाढवतील. पाकिस्तानच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख असलेले मिर्झा २४ ऑक्टोबर रोजी आठ सदस्यीय प्रतिनिधीमंडळासह बांगलादेशात पोहोचले होते. त्यांच्या या दौर्‍यात त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमाँ यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली.

मिर्झा यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचीही भेट घेतली होती. युनूस यांनी त्यांना ‘आर्ट ऑफ ट्रायम्फ’ नावाचे पुस्तक भेट दिले होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या नकाशात भारताच्या ईशान्येकडील काही भागांना बांगलादेशाचा हिस्सा म्हणून दर्शविण्यात आले होते. या कृतीनंतर भारतभर असंतोष व्यक्त झाला. देशाच्या मुख्य भूमीला ईशान्य भारताशी जोडणारा अरुंद भूभाग म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर, ज्याला त्याच्या संकुचित आकारामुळे “चिकन नेक” असेही म्हटले जाते. काही ठिकाणी या कॉरिडॉरची रुंदी फक्त २१ किलोमीटर एवढी आहे. या परिसराच्या शेजारी नेपाळ, बांगलादेश आणि भुटान ही तीन देशे आहेत.

दरम्यान, बांगलादेश सिलिगुडी कॉरिडॉरलगत असलेला आपला लालमोनिरहाट एअरबेस पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ब्रिटिश काळात उभारलेला हा एअरबेस अनेक वर्षांपासून निष्क्रिय होता. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमाँ यांनी १६ ऑक्टोबर रोजी १९३१ मध्ये बांधलेल्या या जुन्या एअरबेसला भेट दिली होती. येथे लढाऊ विमानांसाठी मोठे हॅंगर बांधले जात आहेत. या एअरबेसच्या पुनर्बांधणीमागे चीनचा प्रभाव असल्याचे संकेत मिळत आहेत. बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांनी मार्च महिन्यात चीनचा दौरा केला होता आणि बीजिंगमध्ये चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech