१० नोव्हेंबरला हजर राहण्याच्या सूचना
मुंबई : मराठा आरक्षणासाठी ऐन गणेशोत्सव काळात आझाद मैदानावर आंदोलन करणारे आंदोलन मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी जरांगे यांनी आमरण उपोषण केलं होतं. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सध्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं जरांगेंनी म्हटल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, जरांगेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. या प्रकरणात पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत या चार जणांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जरांगे आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले असून या चौकशीला जरांगे उपस्थित राहतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.