मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ, मुंबई पोलिसांनी केला खुलासा

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात दोन संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे मातोश्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यावर सुरू असलेल्या उलठ सुलट चर्चांवर मुंबई पोलिसांनी अधिकृत खुलासा केल्याने या विषयाला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या आसपास दोन संशयास्पद ड्रोन उडताना दिसले होते. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याने, ड्रोन नेमका कोणी उडवला? यामागे हेतू काय होता? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे ड्रोन कोणीही संशयास्पद हेतूने उडवले नव्हते. एमएमआरडीएने पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी खेरवाडी आणि बीकेसी परिसरात ड्रोन उडवण्याची अधिकृत परवानगी घेतली होती. हे ड्रोन याच सर्वेक्षणाचा भाग म्हणून उडवण्यात आले होते, त्यामुळे ‘मातोश्री’च्या सुरक्षिततेला कोणताही धोका नव्हता.

मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर हे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. हे ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या या ड्रोनचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून म्हटले आहे की, “ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सिक्युरिटी झोन असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech