पक्षप्रवेश वॉर’मुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलणार का? ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केला प्रवेश

शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा देखील भाजपात प्रवेश

भाजपा शिवसेना युती धर्माला तिलांजली ?

कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दिपेश म्हात्रे यांनी शरणागती पत्कारात रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते भाजपात प्रवेश केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तर दिपेश म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे, शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, युवसेना कल्याण जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे, कॉंग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष तरे, कल्याण पुर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख संजय गायकवाड, मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख संदीप सामंत, शाखा प्रमुख मनोज वैद्य, उपविभाग प्रमुख अरविंद मानकर, उपशाखा प्रमुख राजू सावंत आदींसह इतर अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपाची मेगा भरती पार पडली.

या पक्ष प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राजकारण एकदम तापले आहे. भाजपने युती मधील पक्षासह विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. डोंबिवलीतील जिमखाना मैदानात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले, “माझ्या विरोधात असलेले चांगले युवा नेते दीपेश म्हात्रे आता भाजपमध्ये आले आहेत. महापालिकेला पारदर्शक महापौर देण्याचा मुहूर्त ठरला आहे. हा महापौर महायुतीचा असेल, मात्र नक्की कुणाचा, याचा उलगडा योग्य वेळी होईल. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक नेतृत्व देऊ.” त्यांनी लवकरच आणखी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूचक वक्तव्य केले.

तर दीपेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी प्रवेश केला. लोकांना न्याय देण्यासाठी आणि विकासाची कामे करण्यासाठी सत्तेच्या आणि निर्णय घेणाऱ्या टेबलवर असणे गरजेचे आहे. यावेळी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करत “मी उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे, त्यांनी मला संधी दिली. पण ठाकरे गटात खालच्या नेतृत्वाची काम करण्याची पद्धत, जुने आणि नवीन यांच्यातला फरक करण्याची पद्धत याला सर्वजण कंटाळले आहेत. गेली तीन वर्षे निधी नसल्याने लोकांची कामे करण्यास त्रास होत होता आणि गळचेपी देखील होत होती. लोकहित साधण्यासाठी आम्ही भाजपमध्ये आलो. भाजपाने कोणतीही कमीटमेंट दिली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

तर भाजपच्या या दणकेबाज प्रवेशावर शिवसेना (शिंदे गट) देखील आक्रमक झाले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये तोंडी स्वरूपात असा समझोता झाला होता की दोन्ही पक्षांनी कोणत्याही स्तरावर एकमेकांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. या निर्णयामागचा उद्देश महायुतीत स्थानिक पातळीवरील वाद टाळणे हा होता. तथापि, रविवारी डोंबिवलीत भाजपकडून आयोजित कार्यक्रमात शिंदे सेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते — ज्यामध्ये काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या घटनेवर शिंदे सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुले पत्र देत म्हटले आहे की, भाजपने आघाडीच्या तत्वांना तिलांजली देत आपला खरा चेहरा दाखवला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संयम दाखवू नये अशी मागणी राजेश कदम यांनी केली आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या या ‘पक्षप्रवेश वॉर’मुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech