डोंबिवली : केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळाचे सरकार स्थापन करू शकते. यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांमध्ये नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली मध्ये महापौर भाजपचाच असेल अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सेनेला ठणकावले आहे.
डोंबिवली जिमखाना येथे आज विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर चव्हाण हे पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले की विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपवर विश्वास दाखवत प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ दिला जाणार नाही. डोंबिवली मतदार संघात वर्षानुवर्ष शिवसेनेत काम करणारे दीपेश म्हात्रे आणि म्हात्रे परिवार हे सर्व कार्यकर्ते म्हणून माझे सहकारी आहेत तसेच नगरसेवक संतोष तरे कल्याण पूर्व मधील संजय गायकवाड तसेच अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा झालेला पक्षप्रवेश पाहता महापौर महायुतीचाच म्हणजेच कोणाचा होईल याचा उलगडा लवकरच होईल असेही त्यांनी शिंदे सेनेला
सुनावले.
भाजपकडून युती धर्माला तिलांजली शिवसेनेत खदखद
कल्याण – महाराष्ट्रात आणि देशात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांची युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये खदखद उफाळून आली आहे. डोंबिवलीतील भाजपच्या आजच्या पक्षप्रवेशात शिंदेसेनेतील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांना देखील भाजपने प्रवेश दिल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी तर भाजपने युती धर्माला तिलांजली दिली असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता बिलकुल संयम दाखवू नये अशा शब्दात उघडणारा जी व्यक्त केली आहे. तर भाजपनेही राजेश कदम यांच्या नाराजीला तोडीस तोड उत्तर देत कदम यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊन नये असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील या नेत्यांचा उपस्थितीत डोंबिवली मध्ये आज मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये भाजपने ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे ना तर भाजपमध्ये घेतलेच, मात्र त्याचबरोबर काँग्रेस आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या नगरसेवकांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला. शिंदे सेनेचे पदाधिकारी फोडल्यामुळे कल्याण डोंबिवलीतील शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले. देशात आणि राज्यात भाजप आणि शिंदे शिवसेना हे युतीमध्ये असताना महापालिका निवडणुकांमध्ये मात्र भाजपकडून युती धर्माला उघड उघड तिलांजली दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप बाबत अधिक संयम बाळगू नये असेही त्यांनी म्हटले. शिंदे सेनेचे राजेश कदम यांच्या भाजप वरील टिके मुळे लगोलग भाजपचे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील राजेश कदम यांना खडे बोल सुनावले.
राजेश कदम यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊन ये आणि भाजपा नेत्यांवर टीका करू नये अशा स्पष्ट शब्दात सूर्यवंशी यांनी राजेश कदम यांच्या विधानांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तिन्ही मोठे नेते निर्णय घेण्यास सक्षम आहेत त्यामध्ये लहान नेत्यांनी लुडबुड करू नये असेही नरेंद्र सूर्यवंशी यांनी सुनावले आहे.यामुळे एकूणच शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळून आले असून भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे कल्याण डोंबिवलीतील स्थानिक शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.