१२२ सदस्यांसाठी ३१ प्रभाग, १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांना बसला आरक्षण सोडतीचा फटका
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या ३१ असून तीन जागांचे ०२ प्रभाग व चार जागांचे २९ प्रभाग आहेत. १२२ जागापैकी १२ जागा अनुसूचित जाती, ३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ०६ जागा अनुसूचित जाती (महिला), ०२ जागा अनुसूचित जमाती (महिला), १६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि ३७ सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
या आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. नागरिकांना १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे उपायुक्त उपायुक्त समीर भूमकर यांनी केले.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड असे पॅनल करण्यात आले आहेत. मात्र या पॅनलमध्ये कुणाला कोणते आरक्षण हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इच्छूकांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. त्यावर अनेक माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. पॅनल पद्धतीत ज्यांचे पक्षात खूप वजन आहे. जे श्रीमंत आहे त्यांना या आरक्षण सोडतीचा फायदा होणार आहे. ही मंडळी त्यांच्या घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी मागतील. त्यामुळे खरा कार्यकर्ता उमेदवारी मिळण्यापासून वंचितच राहणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांना बसला आरक्षण सोडतीचा फटका
तर कल्याण पश्चिमचे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांना या आरक्षण सोडतीचा मोठा फटका बसला असून प्रभाग क्र. ५ बिर्ला कॉलेज, खडकपाडा, वायलेनगर या प्रभागातून पाटील यांचे चिरंजीव युवसेना उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील हे इच्छुक होते. त्यादृष्टीने गेली अनेक वर्षे ते काम देखील करत होते. मात्र या प्रभागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्याने अनिरुद्ध पाटील यांना दुसरा प्रभाग पहावा लागणार आहे. तर संपूर्ण शिवसेना शहरासाठी नेहमी कार्यरत असलेल्या रवी पाटील आणि अनिरुद्ध पाटील यांना पक्षाने दुसऱ्या प्रभागातून संधी देऊन निवडून आणण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. केडीएमसीची सहावी सार्वत्रिक निवडणूक ही पँनल पध्दतीत होणार असल्याने राजकीय प्रस्थापित पक्षासाठी वर्चस्वाची लढाई तर अपक्षासाठी अस्तित्वात अबाधित ठेवण्यासाठी पँनलची मोट बांधून निवडणूकांना समारे जावे लागणार आहे, तर मतदार राजा यामध्ये मतदानाचा हक्क बाजावून कोणाला पसंती देत कोणाला चपराक देणार हे निवडणूक निकाला नंतर च चित्र स्पष्ट होईल.