दिल्ली स्फोट : फरीदाबादमध्ये सापडली लाल इकोस्पोर्ट कार

0

नवी दिल्ली : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संशयितांनी वापरलेली दुसरी लाल रंगाची इकोस्पोर्ट कार फरीदाबादच्या खंदावली गावातून जप्त करण्यात आली आहे. फरीदाबाद पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच तातडीने कारवाई करून गाडी आपल्या ताब्यात घेतली आहे. या कारची जप्ती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण या घटनेचे धागेदोरे फरीदाबादशी जोडले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिस या गाडीशी संबंधित इतर पुराव्यांचा शोध घेत असून पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, फरीदाबाद पोलिसांनी लाल रंगाची इकोस्पोर्ट (डीएल १० सीके ०४५८) जप्त केली असून, तिचा संबंध दिल्ली स्फोट प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर उन नबी याच्याशी असल्याचा संशय आहे. ही कार खंदावली गावाजवळ उभी आढळली.

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलशी संबंधित संशयित फरीदाबादमध्ये पोलिसांच्या वाढत्या कारवाईनंतर दोन कारमधून दिल्लीला पोहोचले होते. त्यापैकी एका कारमधून (हरियाणा क्रमांकाची) लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणला गेला, तर दुसरी लाल रंगाची इकोस्पोर्ट कार (डीएल-१० सीके-०४५८) बेलगामपणे फिरत असल्याचे दिसून आले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही कार एकत्रच दिल्लीला पोहोचल्या आणि चांदणी चौक पार्किंगमध्येही एकत्र उभ्या होत्या. या इकोस्पोर्ट कारमध्ये एक संशयित व्यक्ती बसलेली होती आणि तो आय-२० कारमधील संशयितांशी संवाद साधत होता. स्पेशल सेलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या दोन्ही कार बदरपूर सीमारेषेतून एकत्रच दिल्लीमध्ये आल्या होत्या आणि नंतर चांदणी चौक व लाल किल्ला परिसरात फिरत होत्या.

दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवार उशिरापर्यंत या कारबाबत किंवा त्यात बसलेल्या संशयिताबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नव्हती. पोलिस आता या गाडीशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या तपशीलाचा शोध घेत आहेत, ज्यामुळे त्यात बसलेल्या संशयितापर्यंत पोहोचून संपूर्ण प्रकरणातील धागेदोरे जोडता येतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech