कोल्हापूर : चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्क आणि पर्यटन हब तयार करून या भागाचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नगरपरिषदेच्या निवडणुकीतील भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित चंदगड येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी एका बाजूला शक्तिपीठाला विरोध होत असताना शक्तिपीठाचे समर्थन करून हा महामार्ग चंदगड मार्गे व्हावा असा आग्रह केला. त्यासाठी मोर्चा काढला. त्यामुळे ९० हजार कोटी रुपयाचा हा महामार्ग या भागातून जाणार आहे याच माध्यमातून चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा भागात नवीन एमआयडीसी, लॉजिस्टिक पार्क, आणि पर्यटन हब विकसित करणार आहे आणि त्या माध्यमातून या भागासह या तिन्ही शहराचा चांगला विकास होणार आहे.
यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की साठ वर्षात देशातील ग्रामीण भागासाठी अनेक योजना तयार झाल्या पण काही प्रमुख शहरांच्या विकासासाठी मात्र योजना केल्या नाहीत त्यामुळे अनेक शहरातील समस्या वाढल्या. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून शहररांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. शहराच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. स्मार्ट सिटी ही योजना ही सुरू केली. यातून छोट्या मोठ्या शहरात योजना सुरू केल्या आहेत. त्यातून अनेक शहरांचा विकास होत आहे. त्यामुळेच देशाच्या जीडीपी मध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर्ती भागातील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेला हा चंदगड, आजरा, गडहिंग्लज भाग विकसित आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीला विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेशचे महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.