मनमानी पद्धतीने घरभाडे वाढविता येणार नाही
मुंबई : केंद्र सरकारने घरभाडे नियम २०२५ लागू केला आहे. ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे भाडेतत्त्वावर घर घेणे सोपे होईल आणि मनमानी पद्धतीने घरभाडे वाढवणे, अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागणार नाही. नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घरमालक आणि भाडेकरु यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल. त्यातील नियमानुसार सुरक्षा अनामत रकमेची मर्यादा निश्चित केली जाईल. याशिवाय हे देखील स्पष्ट केले जाईल की घरभाडे कधी वाढवता येईल आणि किती वाढवता येईल. यामध्ये घर रिकामे करणे, दुरुस्त करणे, पर्यवेक्षण आणि भाडेकरुंच्या सुरक्षेसंदर्भातील अधिकारांचा स्पष्ट उल्लेख असेल. यामुळे एखादा वाद सोडवण्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम निश्चित केले जाईल. या नियमामुळे बंगळुरु, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे.
या सुधारणा केवळ भाडेकरुंसाठी नाहीत घरमालकांसाठी देखील आहेत. घरमालकांना नियमांच्या योग्य अंमलबदावणीसह वाद सोडवण्यासंदर्भात विश्वास देणं आहे. घर भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भातील नियम डिजिटल करण्यात आले आहेत. नियमांनुसार भाडेकरारावर डिजीटल स्टॅम्प असणं आवश्यक आहे. भाडेकरार सही करण्यासाठी ६० दिवसांच्या आत ऑनलाईन नोंदणीकृत झाला पाहिजे. तसे न झाल्यास दंड लागू शकतो, दंडाची रक्कम ५ हजार रुपयांपासून सुरु होईल.