भारताला इंधन पुरवठा अखंडित सुरू राहील – राष्ट्राध्यक्ष पुतीन

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत हैदराबाद हाऊसमध्ये बैठक घेतली. २३ व्या भारत–रशिया शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी रशिया सतत आणि अखंड इंधनपुरवठा करण्यास तयार आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माझे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेचे, रशियन प्रतिनिधिमंडळाचे ज्या उत्साहाने स्वागत केले त्याबद्दल धन्यवाद.” त्यांनी पुढे सांगितले.

“आपण एससीओ बैठकीदरम्यान भेटलो होतो आणि आम्ही रशिया–भारत संवादाचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहोत.” पुतिन म्हणाले की आजची चर्चा सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाली. “माझे आणि पंतप्रधान मोदी यांचे नियमितपणे दूरध्वनीवर संवाद होत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे इंधन अखंडितपणे पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. रशिया भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या निर्मितीतही मदत करत आहे. दोन्ही देश हळूहळू व्यवहारांच्या सेटलमेंटसाठी आपल्या राष्ट्रीय चलनांचा वापर वाढवत आहेत. आम्ही वार्षिक द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

पुतिन पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी आम्हाला दोन्ही देशांच्या सरकारांनी लक्ष द्याव्या अशा आव्हानांची सूची दिली आहे आणि आम्ही त्यावर काम करू. यामुळे भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनमध्ये फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट करण्यास मदत मिळेल.” त्यांनी सांगितले की सध्या ९६ % व्यवहार दोन्ही देशांच्या राष्ट्रीय चलनांत होत आहेत.“ऊर्जा क्षेत्रातील आमची भागीदारी अत्यंत यशस्वी आहे. तेल, गॅस, कोळसा आणि भारताच्या ऊर्जा गरजांशी संबंधित सर्व पुरवठा स्थिर आहे.”

पुतिन म्हणाले, “आम्ही कुडनकुलम येथे भारताचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून उभारत आहोत. सहा रिऍक्टर युनिट्सपैकी दोन आधीच ग्रीडला जोडले गेले आहेत आणि चार आणखी बांधकामाधीन आहेत. हा प्लांट पूर्ण क्षमतेने चालू झाल्यावर भारताच्या ऊर्जा गरजांमध्ये मोठे योगदान देईल आणि उद्योगांना व घरांना स्वस्त, स्वच्छ ऊर्जा मिळेल.”“आम्ही लहान मॉड्युलर रिऍक्टर, तरंगते अणुऊर्जा केंद्र आणि वैद्यक व शेतीसारख्या अणु-तंत्रज्ञानाच्या गैर-ऊर्जाविषयक वापरावरही चर्चा करत आहोत.”

पुतिन यांनी सांगितले, “भारतासोबत आम्ही नवीन आंतरराष्ट्रीय वाहतूक मार्ग तयार करत आहोत. यात नॉर्थ–साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हा मोठा प्रकल्प आहे. याचा अर्थ असा की रशिया किंवा बेलारूस येथून माल थेट हिंद महासागर मार्गे पोहोचू शकेल. यामुळे व्यापार जलद, स्वस्त आणि सुलभ होईल.”या दरम्यान पुतिन म्हणाले की, “मागील जवळपास ५० वर्षांपासून रशिया भारतीय सेनेला शस्त्रसामग्री पुरवत आहे आणि तिला आधुनिकीकरणात मदत करत आहे— मग ते लष्कर असो, विमानन असो किंवा नौदल. एकूणच, आपण आज केलेल्या चर्चेच्या परिणामांनी आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की हा दौरा आणि केलेले करार भारत–रशिया रणनीतिक भागीदारी अधिक खोल करतील आणि दोन्ही देशांच्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.”

पुतिन म्हणाले की गेल्या वर्षी भारत–रशिया द्विपक्षीय व्यापारात १२% वाढ झाली, जे स्वतःमध्ये नवा विक्रम आहे. विविध स्रोतांमध्ये आकडे थोडे फरकाने दिसतात, परंतु सरासरी हा व्यापार सुमारे ६४ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे.त्यांनी म्हटले की यंदाही व्यापाराचा स्तर तितकाच मजबूत राहील अशी अपेक्षा आहे. दोन्ही देश व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी तयार आहेत. रशियातून भारतात होणाऱ्या आयातीतील सुमारे ७६% हिस्सा कच्च्या तेलाचा आहे. इतर तेल आणि कोळसा यात धरला तर हा आकडा ८५ % पर्यंत जातो. तर भारतातून रशियाला औषधे, फाइन केमिकल्स, वस्त्रे, चहा, कॉफी, तांदूळ, मसाले इत्यादींची निर्यात होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech