बनावट पावती पुस्तक मिळाल्याने पार्किंगच्या चालकास अटक
कल्याण : मध्य रेल्वेच्या व्हिजीलन्स विभागाने कल्याण पूर्वेतील रेल्वे हद्दीत चालविल्या जाणाऱ्या पे अ’ण्ड पार्कवर छापा टाकला असता चालकाकचे बनावटी पावती पूस्तक मिळून आले. प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन हे पार्किंग चालविले जात असल्याची बाब व्हिजिलन्स विभागाच्या निदर्शनास आली आहे. पार्किंग चालविणारा हरिशंकर प्रजापती याला कारवाई पथकाने अटक केली आहे.
कारवाई पथकातील एकाने पार्किंगवर गाडी पार्क केली. त्याठीकाणी पावती घेतली. त्या पावतीवर डीएस इंटरप्रायझेस साईट एम असे लिहिले होते. कारवाई पथकातील अधिकाऱ्यास संशय आला. त्याने त्याला दिलेली पावती तपासून पाहिली असता ती पावती बनावट असल्याचे आढळून आले. देण्यात आलेली पावती पार्किंग चालकाने स्वत: छापली होती. त्याठिकाणी कागदपत्र मिळून आले. ते कागदपत्रही बनावट असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कारवाई पथकाने हरिशंकर प्रजापती याला ताब्यात घेऊन आरपीएफच्या हवाली केले आहे.
आरपीएफकडून पुढील तपास सुरु आहे. हे पार्किंग प्रजापती कधीपासून चालवित होता. त्याने रेल्वे प्रशासनाची फसवणूक केली आहे. त्यातून त्याने किती माया गोळा केली ? या कामात त्याला रेल्वे अधिकारी आणि अन्य कोणत्या अधिकारी वर्गाची साथ होती का ? या विविध अंगाने तपास सुरु करण्यात आला आहे.