विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नाही
नागपूर : सरकारमधील एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नागपुरात केला. हे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात. काल मुख्यमंत्र्यांनी इंडिगो विमानावरून उद्धव ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सत्ताधारी चार्टर्ड विमानाने आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेते इंडिगोच्या विमानाने फिरले काय. एक उपमुख्यमंत्री प्रचाराच्या हेलिकाॅप्टरमधून आनंदाचा शिधा घेऊन जातात. रूपयाने मान टाकलेली आहे, असेही ठाकरे म्हणाले.
विधान भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता दोन गट पडले आहे. त्यापैकी २२ जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशाराही दिला होता. हा इशारा कुणाला होता, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. विमान कंपन्या केंद्र सरकारचे ऐकत नाही. देशभरात विमान प्रवासाची वाट लागली आहे. हा गंभीर विषय मुख्यमंत्री टोलवत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये तपोवन, नागपूरमध्ये अजनी वन, संजय गांधी उद्यानमध्ये पर्यावरण वाचले आहे, ते उद्ध्वस्त करण्यामागे सरकार लागले आहे. देशभरात पर्यवरण टिकवून आहे. सरकार विकासाच्या नावावर विनाश करीत आहे.
अधिवेशनाचा कालावधी कमी झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. शहराची वाट लागत आहे. पॉलिसीवर चर्चा होत नाही. सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद देण्याची बातमी पेरलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले.