राज्यातील महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू, २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान

0

मुंबई : बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात देखील आदेश निर्गमित केले आहेत.

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे : २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५, नामनिर्देशनपत्रांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- ०२ जानेवारी २०२६, निवडणूक चिन्ह वाटप- ०३ जानेवारी २०२६, अंतिम उमेदवारांची यादी- ०३ जानेवारी २०२६,मतदानाचा दिनांक – १५ जानेवारी २०२६, मतमोजणीचा दिनांक- १६ जानेवारी २०२६

महानगरपालिकांची नावे : राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या २ नवनिर्मित महानगरपालिका आहेत. ५ महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली आहे. सर्वाधिक १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती; तर ४ महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी: छत्रपती संभाजीनगर: २७ एप्रिल २०२० , नवी मुंबई: ०७ मे २०२०, वसई- विरार: २८ जून २०२०, कल्याण- डोंबिवली: १० नोव्हेंबर २०२०, कोल्हापूर: १५ नोव्हेंबर २०२०, नागपूर: ०४ मार्च २०२२, बृहन्मुंबई: ०७ मार्च २०२२, सोलापूर: ०७ मार्च २०२२, अमरावती: ०८ मार्च २०२२, अकोला: ०८ मार्च २०२२, नाशिक: १३ मार्च २०२२, पिंपरी- चिंचवड: १३ मार्च २०२२, पुणे: १४ मार्च २०२२, उल्हासनगर: ०४ एप्रिल २०२२ , ठाणे: ०५ एप्रिल २०२२, चंद्रपूर: २९ एप्रिल २०२२, परभणी: १५ मे २०२२, लातूर: २१ मे २०२२, भिवंडी- निजामपूर: ०८ जून २०२२, मालेगाव: १३ जून २०२२, पनवेल: ९ जुलै २०२२, मीरा- भाईंदर: २७ ऑगस्ट २०२२, नांदेड- वाघाळा: ३१ ऑक्टोबर २०२२, सांगली- मीरज- कुपवाड: १९ ऑगस्ट २०२३, जळगाव: १७ सप्टेंबर २०२३, अहिल्यानगर: २७ डिसेंबर २०२३, धुळे: ३० डिसेंबर २०२३, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech