विदेशी मद्याच्या एकूण ७११ बॉक्ससह कंटेनर आणि मोबाईल असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त
कल्याण : नाताळ आणि नूतन वर्षानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाने कारवाई करत गोवा निर्मीत मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य साठा वाहतूकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत विदेशी मद्याच्या एकूण ७११ बॉक्ससह कंटेनर आणि मोबाईल असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी चालक आसिफ आस महम्मद याला अटक करण्यात आली आहे.
नाताळ आणि नूतन वर्षानिमित्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे परराज्यातील (गोवा) मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी बायपास येथे मंगळवारी दारूबंदी गुन्हयाकामी गस्त घालत असताना रात्री अशोक लेलॅन्ड कंपनीच्या कंटेनरवर संशय आल्याने या वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला गोवा निर्मात व मध्यप्रदेश या राज्यातील विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य असा एकूण ७११ बॉक्स मध्ये रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्कीचे एकूण ५५४ बॉक्स मिळून आहे. तर रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या सिलबंद बाटल्यांचे एकूण 157 बॉक्स मिळून आले.
या वाहनावर छापा घालून गुन्हा नोंद करण्यात आला असून एकूण विदेशी मद्य ७११ बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहेत. तसेच या गुन्ह्यामध्ये अशोक लेलॅन्ड कंपनीचा, पांढऱ्या रंगाचा केबीनच्या कंटेनरसह एकूण.१ कोटी ९१ हजार ८८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी असिफ आस मोहम्मद (वाहन चालक) याला अटक केली आहे. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक दिपक परब, दुय्यम निरीक्षक आर.व्ही. सानप, टि.सी. चव्हाण, ,राज्य उत्पादन शुल्क, भिवंडी विभाग निरीक्षक एन.जे. शिरसाठ, जवान आर.एम.राठोड, के. एस. वझे, व्ही.एस. कुंभार, एन. अ.लोखंडे या स्टाफसह करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिपक परब हे करीत आहेत.