नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एका सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. भारत–ओमान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल औओमान’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. ओमानची राजधानी मस्कत येथे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान मोदी सध्या ओमानच्या दौऱ्यावर असून, हा त्यांचा तीन देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. ते आजच ओमानहून स्वदेशात परतणार आहेत. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान त्यांनी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या देशांचा दौरा केला होता. यापूर्वी, इथिओपियानेही पंतप्रधान मोदी यांना ‘ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवले होते. हा सन्मान इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांनी त्यांना प्रदान केला होता. विशेष म्हणजे, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान आहेत.
याशिवाय, संयुक्त राष्ट्रसंघानेही पर्यावरण संरक्षणासाठी पंतप्रधान मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे सर्व सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीचे प्रतीक नसून, भारताची वाढती जागतिक ताकद आणि प्रभाव यांचेही प्रतिबिंब आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला आत्मसात करत जागतिक दक्षिणेचा आवाज अधिक बळकट केला आहे. त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे नवे व्यापारिक संधी, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना चालना मिळाली आहे.