दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

0

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या- माजी मंत्री आणि राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने काँग्रेससह राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शालिनीताई पाटील यांच्यावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय जीवनात शालिनीताईंनी खंबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

शालिनीताई पाटील यांचा राजकीय प्रवास संघर्षपूर्ण आणि चर्चेचा राहिला. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाहानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९८० च्या दशकात काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. यापूर्वी १९९० मध्ये जनता दल मधून आणि १९९५ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. शालिनीताई पाटील यांच्या निधनाने एक अभ्यासू, स्पष्टवक्त्या आणि संघर्षशील राजकीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech