उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आपला कल्याण महोत्सवाला भेट
कल्याण : मागील विधानसभा निवडणुकीत महेश गायकवाड एकटा लढला आणि पडला, आम्ही महायुतीचा धर्म पाळला, परंतु महेश एकटा लढला, तो पडला, परंतु आम्ही त्याच्या बरोबर असतो तर काय झाले असते ते सांगयची गरज नाही, तो पडला तरीही त्याने लोकांची कामे करण्याची आपली तळमळ सोडली नाही, तो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे, त्यामुळेच महेश गायकवाड हे कल्याण पूर्वेतील शिवसेनेची भगवी रेष आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या कपाळावरची भगवी रेष कोणालाही पुसता येणार नाही ‘ अशा शब्दात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक केले.
आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडवर सुरु असलेल्या आपला कल्याण महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शुक्रवारी रात्री सदिच्छा भेट दिली. यावेळी कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे माजी नगर सेवक महेश गायकवाड याचे कार्य हे केवळ मात्र वॉटर – मिटर – गटर पुरते मर्यादीत न रहाता सर्व दूर पसरले आहे, त्या मुळे त्याला जनतेचा आर्शिवाद मिळाल्याने तो मोठ्या संकटातून वाचला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी महेश गायकवाड आणि शिवसेनेवर विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपांना खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उत्तर दिल्याची चर्चा कल्याण पूर्वेत रंगली आहे.