एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार

0

नवी दिल्ली : एअर मार्शल नागेश कपूर यांनी आज दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. सर्वोत्तम युद्ध सेवा पदक,परम विशिष्ट सेवा पदक,अति विशिष्ट सेवा पदक, वायू सेना पदक यांनी सन्मानित एअर मार्शल कपूर यांनी डिसेंबर १९८५ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ०६ डिसेंबर १९८६ रोजी ते हवाई दलाच्या उड्डाण दलात लढाऊ विभागात रुजू झाले. एअर मार्शल कपूर हे एक अनुभवी लढाऊ वैमानिक, उड्डाण प्रशिक्षक आणि फायटर कॉम्बॅट लीडर आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मिग-२१ आणि मिग-२९ च्या सर्व श्रेणीतील विमानांचे उड्डाण केले आहे, यासोबतच विविध लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांचा ३४०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव त्यांना आहे.

ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. एअर मार्शल कपूर यांनी ३९ वर्षांपेक्षा जास्त काळ देशाला सेवा दिली आहे. या काळात त्यांनी कमांड, कार्यान्वयीन, प्रशिक्षण आणि कर्मचारी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आपल्या कार्यान्वयीन जबादारीच्या कार्यकाळात एअर मार्शल कपूर यांनी मध्य विभागातील एका फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, पश्चिम विभागातील उड्डाण तळाचे स्टेशन कमांडर आणि एका प्रमुख हवाई तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.

एअर मार्शल कपूर यांनी पाकिस्तानात भारताचे डिफेन्स अटॅचे म्हणून राजनैतिक जबाबदारीही सांभाळली आहे. हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ प्रशिक्षण कमांड आणि त्यानंतर एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ दक्षिण-पश्चिम एअर कमांड म्हणूनही सेवा दिली आहे. त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या अतुलनीय आणि गौरवशाली सेवेबद्दल २००८ मध्ये त्यांना वायू सेना पदक, २०२२ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २०२५ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदक या राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. एअर मार्शल नागेश कपूर यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल तिवारी हे देशाला ४० वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech