इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर: १४ मृत्यू, १६२ जण रुग्णालयात

0

मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे संकेत; प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६२ नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, अशी अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.

मृतांमध्ये अरविंद हिरालाल (वय ४३) यांचा समावेश आहे. ते कुलकर्णी भट्टा परिसरातील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त भागीरथपुरा येथे गेले असता दूषित पाण्याच्या संपर्कामुळे त्यांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरला भेट दिली. त्यांनी बाधित रुग्णांची रुग्णालयात जाऊन पाहणी केली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रभावी व्यवस्थापन आवश्यक असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात २ जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, परिसरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढत आहे.राज्य शासनाने न्यायालयाला माहिती दिली की, इंदूरमधील १० रुग्णालयांमध्ये सर्व बाधित रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. यावर न्यायालयाने “हे शासनाचे कर्तव्य आहे,” अशी टिप्पणी करत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल २ जानेवारी रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech