ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन; शस्त्र, मद्य व अंमली पदार्थ जप्त

0

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ या १७ दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक व कठोर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली. या कालावधीत अवैध मद्य, अंमली पदार्थ, रसायने, शस्त्रास्त्रे, प्रचार साहित्य व रोख रक्कम असा एकूण रूपये २ कोटी ७५ लाख ०९ हजार ९६५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पथकातंर्गत्‍ नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथके, फ्लाइंग स्क्वॉड व लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मॉडेला चेक नाका, श्रीनगर, किसननगर, खारीगांव, नाशिक रोड, मुंब्रा, खिडकाळी, डायघर, शीळ रोड, विटावा, मनिषानगर, खारीगांव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहिम सुरू आहे. या मोहिमेत ९.५४ लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थ व शस्त्रांवर कारवाई विशेष मोहिमेत ५७९३७.१७६ किलो अंमली पदार्थ (किंमत रु. २,२८,४८,७५७.००) जप्त, ५९ अवैध शस्त्रास्त्रे जप्त करुन ६१९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहे. तसेच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर यांचेवर शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यवाटप रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रु. १०,२६,०६३ किमतीचे १०,६५८.८९ लिटर मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईत ६८ गुन्हे दाखल करुन ५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गावठी दारू — १,१४६ लिटर (रु.१,१४,६३३), देशी मद्य — ८९.९३ लिटर (रु ३५,७७०), बीअर — ७०.५५ लिटर (रु २०,७४०), विदेशी मद्य/वाईन — ३२.३ लिटर (रु.३८,९३५), रसायने — ५५,२५० लिटर (रु १९,३३,७५०) असा एकूण रु. २६,८१,१४५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम
शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेमार्फत सार्वजनिक व खासगी मालमत्तेवरील बेकायदेशीर प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम राबविण्यात आली असल्याचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले. तसेच ही सर्व कारवाई सी.सी.टिव्हीच्या निगराणीखाली करण्यात येत असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक ठेवण्यासाठी आचारसंहिता उल्लंघनावर तात्काळ व कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस प्रशासनाने दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech