महिलांसाठी रोजगार आणि मूलभूत सुविधा प्राधान्य
(धनश्री पाठारी)
आंबिवली : भाजप आणि शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा प्रचार दौरा आज आंबिवलीतील वाजपेयी चौक ते इंदिरा नगर परिसरात पार पडला. या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो, असे विचारले असता ॲड. हर्षाली चौधरी म्हणाल्या, “आम्हाला नागरिकांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आम्ही अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, त्या काळातही आमच्या माध्यमातून आवश्यक सेवा पुरवण्यात आल्या.”
महिलांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सांगितले की, महिलांसाठी रोजगार निर्मिती, पाण्याची समस्या तसेच इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच सरकारकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, विकासाच्या मुद्द्यावर बोलताना कनेक्टिविटी हा आंबिवली परिसरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. टिटवाळा–शहाड दरम्यानचा आंबिवली परिसर अद्यापही विकासापासून वंचित असून, या भागातील कनेक्टिविटी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे ॲड. हर्षाली चौधरी यांनी स्पष्ट केले.