मुंबई : उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला. शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे, शेकडो केसेसे अंगावर घेणाऱ्यांना निष्ठावान शिवसैनिकांना बाळासाहेब सवंगडी समजायचे मात्र आज काहीजण बाळासाहेबांच्या सवंगड्यांना घरगडी समजत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.
सकपाळ यांच्यासह अशोक सकपाळ, लक्ष्मण सकपाळ, मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे, रेश्मा सकपाळ, सुषमा सकपाळ, जितेंद्र सकपाळ, संपत नलावडे, भरत मोरे, मनोज म्हात्रे, झाहीर शेख, क्षितीज सकपाळ, सुनील सकपाळ, अनिकेत कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शिवसेना वाढीसाठी ज्यांनी कष्ट उपसले, शेकडो केसेस अंगावर घेतल्या अशा कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करणारे बाळासाहेब होते, आज बाळासाहेब नाहीत. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारा नेता नाही. शिवसेना वाचवण्यासाठी, गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि धनुष्यबाणसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. दगुडदादा म्हणजे बाळासाहेबांचा कट्टर मावळा अशी ओळख आहे. त्यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवण्याचे काम केले. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. शिवसेनेसाठी त्यांनी अंगावर, छातीवर वार घेतले. लालबाग परळ भागात शिवसेना वाढवण्यासाठी दगडू दादांनी अपार कष्ट घेतले. दगडू दादांच्या शिवसेना प्रवेशाने लालबागच्या राजाचा आणि गणेश गल्लीच्या राजाचा आशिर्वाद शिवसेनेला मिळाला, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. साडेतीन वर्ष शिवसेनेसाठी तुरुंगावास भोगला त्यांची अवहेलना करणं दुर्देवी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बेळगावचा लढा, आंदोलने केली शेकडो केसेस झाल्या पण त्याचा विचार कधी दगडूदादांनी केला नाही, असे ते म्हणाले. घाटकोपरच्या सभेमध्ये दगडूदादांनी एकनाथ शिंदे एक दिवस मोठा होईल असे भाकीत केले होते. मी शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालो, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढली. दगडू सकपाळ म्हणजे कणखर नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेब दगडूदादांना सवंगडी समजायचे, पण आताचे लोक सवंगड्यांना घरगडी समजायला लागले. मालक आणि नोकर हा भेद सुरु झाला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. राज्यात २०१९ मध्ये आणि २०२२ मध्ये काय घडले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेनेने ८० जागा लढल्या आणि ६० जागा जिंकल्या त्यांनी १०० जागा लढल्या आणि २० जागा जिंकले. ठाण्यापुरता शिवसेना मर्यादित आहे, असं बोलणाऱ्यांची तोंड नगर परिषद निवडणुकीनंतर बंद झाली. शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार झाला. शिवसेनेचे ७० नगराध्यक्ष आणि १४०० नगरसेवक निवडून आले, असे ते म्हणाले.