भारताने स्वीकारले ब्रिक्स २०२६ चे अध्यक्षपद

0

एस. जयशंकर यांच्या हस्ते थीम व लोगोचे अनावरण

नवी दिल्ली : ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स संघटनेच्या स्थापनेला २०२६ मध्ये २० वर्षे पूर्ण होत असून, यावर्षी या बहुराष्ट्रीय आर्थिक गटाचे अध्यक्षपद भारताने स्वीकारले आहे. मंगळवारी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते ब्रिक्स २०२६ अध्यक्षतेची अधिकृत थीम, लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने या १० सदस्यीय गटाचे नेतृत्व नव्या दृष्टिकोनातून करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात जयशंकर यांनी लोककेंद्रित दृष्टिकोन आणि सुधारित बहुपक्षीयतेच्या गरजेवर भर दिला.भारत चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत असून यापूर्वी २०१२, २०१६ आणि कोविड-१९ च्या आव्हानात्मक काळात २०२१ मध्येही भारताने या गटाचे नेतृत्व केले होते. भारताच्या अध्यक्षतेदरम्यान जागतिक सहकार्य वृद्धिंगत करणे, विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करणे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले की, “ब्रिक्सचे अध्यक्षपद सदस्य देशांची सामूहिक क्षमता एकत्र आणून जागतिक कल्याणासाठी कार्य करेल.” गेल्या दोन दशकांत ब्रिक्स हा उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी सहकार्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनला असल्याचे त्यांनी नमूद केले.ब्रिक्स या नावाची निर्मिती संस्थापक सदस्य देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्या नावांच्या आद्याक्षरांपासून करण्यात आली आहे. त्यानंतर इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि इंडोनेशिया हे देश या मंचाचे पूर्ण सदस्य झाले आहेत.

ब्रिक्स २०२६ शिखर परिषदेचा लोगो भारताचे राष्ट्रीय फूल कमळ यावर आधारित असून, त्याच्या मध्यभागी भारतीय अभिवादन ‘नमस्ते’ यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा लोगो परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या खुल्या स्पर्धेतून निवडण्यात आला असून, सुदीप सुभाष गांधी यांची संकल्पना अंतिम ठरली आहे. ‘नमस्ते’ हे स्वागत, सन्मान आणि सौहार्द व्यक्त करणारे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech