मतदान नक्की करा, आपलं मत आपल्या शहराचं भवितव्य ठरवू शकतं – राज्य निवडणूक आयुक्त

0

मुंबई : “महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या शहराच्या- महानगराच्या जडणघडणीत योगदान द्यावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा. आपलं मत आपल्या शहराचं भवितव्य ठरवू शकतं. कारण ते अनमोल आहे. लोकशाहीतला तो आपला महत्वाचा हक्क आहे आणि तो आपण मतदानाच्या माध्यमातून बजावायला हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मी सर्व मतदारांना आव्हान करतो”, असेे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारी; तसेच १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गच्या १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १४) बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान, मतमोजणी; तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत उपस्थित प्रतिनिधींना अवगत करण्यात आले.

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. १५) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदारांकरिता एकूण ३९ हजार ९२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण १५ हजार ९०८ इतके उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.

मतदान उद्या (ता. १५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधीत ठिकाणी १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरवात होईल. एकूण मतदारांमध्ये १ कोटी ८१ लाख ९४ हजार २९२ पुरुष, १ कोटी ६६ लाख ८० हजार ४४९ महिला; तर ४ हजार ५९६ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण ३९ हजार ९२ मतदान केंद्रांपैकी एकूण ३ हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: ४ मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी ३ ते ५ मते देणे अपेक्षित असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून यांसह सर्व महानगरपालिका मिळून ८९३ प्रभाग आहेत. त्यात एकूण २ हजार ८६९ जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण १५ हजार ९०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

महानगरपालिका निवडणुकांसाठी २९ जिहयात कडक पोलीस बंदोबस्त
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ३ अपर पोलिस अधीक्षक, ६३ पोलीस उप अधीक्षक, ५६ पोलीस निरीक्षक, ८५८ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि ११ हजार ९३८ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण ४२ हजार ७०३ होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण ५७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech