राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण

0

अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी मतदानाची नोंद

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी दिवसभर मतदान पार पडले. तब्बल ९ वर्षांनंतर होणाऱ्या या महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तरी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे चित्र होते. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात आज, गुरुवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी अडचणीही नोंदल्या गेल्या. मतदारयादीतील गोंधळ, मतदान केंद्र शोधताना होणारी धावपळ, बोटावर लावलेली शाई लवकर पुसली जाण्याच्या तक्रारी आणि दुबार मतदानाचे आरोप या कारणांमुळे काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले, ज्यात मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांचा समावेश आहे. मुंबईत सुमारे १७०० उमेदवार, तर राज्यभरात एकूण १५.९३१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. विशेष म्हणजे, ९ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक महापालिकांमध्ये मतदानाचा टक्का कमी दिसत आहे.

राज्यातील मतदानाची टक्केवारी (दुपारी ३.३० वाजेपर्यंत): मुंबई महापालिका: ४१.०८ टक्के, ठाणे: ४३.९६%, कल्याण-डोंबिवली: ३८.६९%, नवी मुंबई: ४५.५१%, उल्हासनगर: ३४.८८%, भिवंडी-निझामपूर: ३८.२१%, मीरा-भाईंदर: ३८.३४%, वसई-विरार: ४५.७५%, पनवेल: ४४.०४%, नाशिक: ३९.६४%, मालेगाव: ४६.१८%, धुळे: ३६.४९%, जळगाव: ३४.२७%, अहिल्यानगर: ४८.४९%, पुणे: ३६.९५%, पिंपरी-चिंचवड: ४०.५०%, सोलापूर: ४०.३९%, कोल्हापूर: ५०.८५%, सांगली-मिरज-कुपवाड: ४१.७९%, छ. संभाजीनगर: ४३.६७%, नांदेड-वाघाळा: ४२.४७%, लातूर: ४३.५८%, परभणी: ४९.१६%, अमरावती: ४०.६२%, अकोला: ४३.३५%, नागपूर: ४१.२३%, चंद्रपूर: ३८.१२%, इचलकरंजी: ४६.२३%, जालना: ४५.९४% राज्यातील मतदार आणि पक्षीय उत्सुकतेने निकालाची प्रतीक्षा करत आहेत. मुंबईत, विशेषतः, प्रतिस्पर्धी पक्षांचे मतदार संघ आणि निवडणूक कार्यकर्ते निकालावर लक्ष ठेवत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech