मनसे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खुल्या समर्थनासह काँग्रेसचा छुपा पाठिंबा
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या राजकिय घडामोडींना वेग आला असून मनसेने शिवसेनेला समर्थन दिले आहे. यामुळे बशिवसेनेचे ५३ नगरसेवक, मनसेचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे एक नगरसेवक रमिज मणियार यांनी खुला पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी आणि समिना शेख या २ नगरसेविकांनी बाहेरून पाठिंबा दिल्याचे समजते.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नॉट रीचेबल असून ठाकरे गटाने स्थापन केलेल्या गट नोंदणीवेळी देखील ते गैरहजर होते. तसेच ठाकरे गटाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत निवडून आलेले राहुल कोट आणि स्वप्नाली केणे या देखील मनसेच्या गट नोंदणी वेळी उपस्थित नव्हते त्यामुळे या चौघांचे देखील शिवसेनेला समर्थन मिळणार असल्याचे समजते. महापौर पदासाठी ६२ नगरसेवकांची आवश्यकता असून सध्या शिवसेनेकडे ६५ नगरसेवकांचे संख्या बळ तयार झाले आहे. त्यामुळे भाजपाला सोबत न घेता देखील शिवसेना सत्ता स्थापन करू शकते अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.