कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे महायुतीला समर्थन

0

महापौर आणि इतर पदांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार

कल्याण : महापौर पदाचे आरक्षण जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसेने शिवसेना आणि महायुतीला समर्थन दिले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी शिवसेनेच्या 53 नगरसेवकांसह मनसेचे नगरसेवकही आज उपस्थित होते. या गट नोंदणीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी ही माहिती दिली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना, भाजप आणि मनसे एकत्रितपणे सत्ता स्थापन करणार असून, युतीतूनच महापौर निवडला जाईल, असा ठाम विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. शिंदे म्हणाले की, केडीएमसीत शिवसेनेने 53 नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन केला आहे, तर मनसेनेही आपल्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला असून, हा पाठिंबा विकास आणि स्थिर प्रशासनासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“युतीमध्ये भाजप आणि शिवसेना निवडणूक लढली असून, कल्याण डोंबिवलीसह इतर सर्व महापालिकांमध्ये आता महायुतीच सत्ता स्थापन करणार आहे. विकासासाठी जे जे येतील त्यांचे स्वागत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्थिरता राहावी आणि विकासकामे चांगल्या पद्धतीने व्हावीत, हीच भूमिका मनसेचीही आहे,” असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मनसे नेते राजू पाटील यांच्याबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, “राजू पाटील हे माझे मित्र आहेत. विकासासाठी आपण एकत्र असले पाहिजे, असे त्यांचेही मत असावे म्हणूनच त्यांनी महायुतीला समर्थन दिले आहे.” तर महापौर किंवा उपमहापौर पदाबाबत स्पष्टता देताना डॉ. शिंदे म्हणाले की, “सध्या कोणत्याही पदाची निश्चिती हा विषय नाही. महापौर किंवा उपमहापौर कोण होणार, याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच घेणार आहेत. तेच अधिकृत निर्णय घेतील.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech