अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून ‘आय-पॅक’ला १३.५ कोटींचे कर्ज

0

नवी दिल्ली : कोलकाता येथील इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी (आय-पॅक) गेल्या काही दिवसांपासून वादांच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान, आय-पॅकने आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती सादर केली आहे. या कागदपत्रांनुसार, आय-पॅकने २०२१ मध्ये हरियाणातील रोहतक येथील एका कंपनीकडून १३.५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे.

आय-पॅकने कागदपत्रांमध्ये कर्ज देणाऱ्या कंपनीचे नाव ‘रामसेतु इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (आरआयआयपीएल) असे नमूद केले आहे. परंतु, कंपनी रजिस्ट्रारकडे तपासणी केली असता अधिकृत नोंदींमध्ये या नावाची कोणतीही कंपनी आढळून आली नाही. कॉर्पोरेट डेटा अ‍ॅग्रिगेटर जौबा कॉर्पनुसार, आरआयआयपेलची स्थापना १८ डिसेंबर २०१३ रोजी झाली होती. ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होती आणि तिचे अधिकृत शेअर भांडवल ५ लाख रुपये होते. कंपनीचे वीरेंद्र आणि विक्रम हे दोन २ संचालक होते.

१८ ऑगस्ट २०१८ रोजी कंपनी कायद्याच्या कलम २४८(१) अंतर्गत आरआयआयपीएलची नोंदणी रद्द करण्यात आली होती. व्यवसाय अपयशी ठरणे, कामकाज बंद करणे किंवा वैधानिक नियमांचे पालन न करणे, अशा कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, परवाना रद्द झाल्यानंतर ३ वर्षांनी, म्हणजेच २०२१ मध्ये, आय-पॅकने या कंपनीकडून कर्ज घेतल्याचा दावा करण्यात आला आहे, जो गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. आर्थिक कागदपत्रांनुसार, आय-पॅक ने अलीकडेच १३.५ कोटी रुपयांच्या कर्जापैकी काही रक्कम परतफेड केली असून, काही कर्ज अद्याप बाकी आहे. आय-पॅक चे हे आर्थिक दस्तावेज पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech