आरोपी मोहम्मद अफ्फान अहमद याला अटक
बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण कोरियन महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफमधील कर्मचारी मोहम्मद अफ्फान अहमद याला अटक केली आहे. तपासणीच्या नावाखाली आरोपी मोहम्मद अफ्फान याने महिलेला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावरून एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफमधील कर्मचाऱ्याला दक्षिण कोरियन महिलेची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियातील ३२ वर्षीय व्यावसायिक महिलेने आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप केले होते. आपल्या तक्रारीत तिने सांगितले की तपासणीच्या नावाखाली आरोपीने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला तसेच मिठी मारली. पीडित महिलेने सांगितले की ती मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आली होती आणि सोमवारी १९ जानेवारी रोजी आपल्या देशात परत जात होती. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ येथे सीआयएसएफची सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक व्यक्ती तिच्याकडे आला. त्याने स्वतःला विमानतळ कर्मचारी असल्याचे सांगितले आणि तिचा बोर्डिंग पास तपासला. आरोपीने तिच्या चेक-इन सामानात काही अडचण असल्याचे सांगून पुन्हा तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले. यानंतर आरोपीने पीडित महिलेची मॅन्युअल फ्रिस्किंग (हाताने तपासणी) करण्याची मागणी केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला पुरुषांच्या शौचालयाजवळ घेऊन गेला, जिथे तपासणीच्या नावाखाली त्याने अनेक वेळा अयोग्यरीत्या स्पर्श केला. यानंतर आरोपीने तिच्या खाजगी अवयवांनाही हात लावला. महिलेने यावर आक्षेप घेतला असता आरोपीने तिला मिठी मारली आणि धन्यवाद म्हणत तिला तिथून जाऊ दिले. या घटनेनंतर महिलेने विमानतळ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफमधील मोहम्मद अफ्फान अहमद याला अटक केली आहे.
यासंदर्भात विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीला तपासणी करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. संशय असल्यास त्याने इमिग्रेशन किंवा सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना माहिती देणे अपेक्षित होते. त्याला स्वतः तपासणी करण्याचा अधिकार नव्हता. तसेच, कोणत्याही महिलांची तपासणी केवळ महिला कर्मचाऱ्यांकडूनच केली जावी, असे नियम आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता महिलेच्या आरोपांची पुष्टी झाल्यानंतर आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.