३ फेब्रुवारी रोजी पार पडणार केडीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक

0

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार ३ फेब्रुवारी रोजी महापौर विराजमान होणार आहे तर महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांना २९ आणि ३० जानेवारी रोजी आपली नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांकडून केला जात होता मात्र महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर भाजप आपसुकच त्यांच्याकडे या प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने शर्यतीतून बाहेर पडला याउलट शिवसेनेकडे या प्रवर्गातील दोन नगरसेवक असल्याने शिवसेनेचा या पदावरील दावा भक्कम झाला आहे. पालिकेत पुढील अडीच वर्षासाठी शिवसेनेचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी या प्रवर्गातून शिवसेनेकडे हर्षाली थवील आणि किरण भांगले असे दोन नगरसेवक आहेत या दोन्ही नगरसेवकांनी महापौर पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर या दोन्ही नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.

तर महापौर पदावर कोण विराजमान होणार हे अद्यापी गुलदस्त्यातच आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचा एक भाग असलेला टिटवाळा आंबिवली या भागाला आतापर्यंतच्या इतिहासात एकदाही महापौर पदाची संधी मिळालेली नसल्याने यावेळी या भागाच्या नगरसेविका असलेल्या थवील यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली जावी यासाठी या भागातील महायुतीचे लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. तर दुसरीकडे भांगले हे शहर प्रमुख रवी पाटील यांचे निकटवर्ती असल्याने भांगले यांना या पदावर विराजमान करण्यासाठी रवी पाटील यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे या पदावर नेमकी कोणाची वर्णी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुका होऊन पंधरा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आत्ता महापौर व उपमहापौर पदासाठीची लगबग सुरू आहे पालिकेच्या सचिव कार्यालयाकडून महापौर व उपमहापौर निवडी बाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमानुसार २९ आणि ३० जानेवारी रोजी या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतील तर प्राप्त अर्जावर मतदान प्रक्रियेने किंवा एकच अर्ज प्राप्त झाल्यास बिनविरोध पद्धतीने ३ फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर व उपमहापौर घोषित केला जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech