नवी दिल्ली : दिल्लीतील हवेची गुणवत्ता एकदा पुन्हा चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर दिल्लीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीचा वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २८१ नोंदवण्यात आला असून तो ‘खराब’ श्रेणीत मोडतो. यापूर्वी शुक्रवारी हवामानात झालेल्या बदलामुळे वाऱ्याची दिशा बदलली आणि वेग वाढल्याने राजधानीतील नागरिकांना प्रदूषणातून काहीसा दिलासा मिळाला होता. त्या काळात हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत पोहोचली होती.
शनिवारी एक्यूआय १९२, तर रविवारी १५२ इतका नोंदवण्यात आला होता.दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी दिल्लीतील विविध भागांमध्ये एक्यूआय पुढीलप्रमाणे नोंदवण्यात आला आहे — अलीपूर ३६२, आनंद विहार ३६२, अशोक विहार ३४८, आया नगर २३०, बवाना ३०९, बुराडी ३०९, चांदणी चौक ३१९, डीटीयू परिसर ३१३, द्वारका सेक्टर-८ ३१२, आयजीआय विमानतळ टी-३ १८८, आयटीओ ३१२, जहांगीरपुरी ३६७, लोधी रोड १८४, मुंडका ३१४, नजफगड २२३, नरेला २८६, पंजाबी बाग ३३७, आर.के. पुरम ३१७, रोहिणी ३५९, सोनिया विहार ३३२, विवेक विहार ३५६ आणि वजीरपूर ३६३.
हवेची गुणवत्ता समजून घेण्यासाठी एक्यूआयचे वर्गीकरण केले जाते. ० ते ५० दरम्यानचा निर्देशांक स्वच्छ हवेसाठी दर्शवतो. ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, तर ३०१ ते ४०० अत्यंत खराब श्रेणीत मोडतो. ४०१ ते ५०० दरम्यान एक्यूआयगेल्यास हवा ‘गंभीर’ स्थितीत मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रदूषित हवेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः आधीपासून आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.