नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर भारताने पाकिस्तानला जोरदार फटकारत ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तान खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानचा एकमेव अजेंडा भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवण्याचाच आहे. त्यांनी हेही उघड केले की १० मे रोजी पाकिस्ताननेच थेट भारताला फोन करून लढाई थांबवण्याची विनंती केली होती.
पर्वथनेनी हरीश म्हणाले,“पाकिस्तानचा एकमेव अजेंडा माझ्या देशाला आणि माझ्या लोकांना हानी पोहोचवण्याचा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरबाबत खोटे आणि स्वार्थी निवेदन केले.” ते पुढे म्हणाले, “९ मेपर्यंत पाकिस्तान भारतावर आणखी हल्ले करण्याच्या धमक्या देत होता. मात्र १० मे रोजी पाकिस्तानी लष्कराने थेट आमच्या लष्कराला फोन करून संघर्ष थांबवण्याची विनंती केली.”
भारतीय राजदूतांनी सांगितले की, “भारतीय कारवाईमुळे पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. ध्वस्त धावपट्ट्या (रनवे) आणि जळालेले हँगर यांची छायाचित्रे सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहेत.” ‘न्यू नॉर्मल’ या मुद्द्यावर बोलताना पी. हरीश म्हणाले, “पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून आम्ही ‘न्यू नॉर्मल’बद्दल ऐकले. मी पुन्हा ठामपणे सांगतो की, दहशतवादाला कधीही सामान्य मानले जाऊ शकत नाही, जसा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करतो. दहशतवाद ही पाकिस्तानची राज्यनीती आहे, पण ती सहन केली जाणार नाही.”
खरं तर पाकिस्तानने सुरक्षा परिषदेला सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूरला दिलेल्या त्यांच्या प्रत्युत्तरातून हे सिद्ध झाले आहे की दबावाच्या जोरावर कोणताही ‘नवा सामान्य’ निर्माण होऊ शकत नाही. यावर प्रत्युत्तर देताना भारताने स्पष्ट केलं की,“दहशतवादाला कधीही सामान्य बनवता येणार नाही, जसा पाकिस्तान बनवू इच्छितो.” भारतीय प्रतिनिधींनी पुढे ठाम शब्दांत सांगितले, “हे पवित्र सभागृह पाकिस्तानसाठी दहशतवादाला वैध ठरवण्याचं व्यासपीठ होऊ शकत नाही.” तसेच,“भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश असून तो भारताचा अविभाज्य आणि अविच्छिन्न भाग होता, आहे आणि सदैव राहील.”
सिंधू जल कराराबाबत बोलताना पी. हरीश म्हणाले,“भारताने ६५ वर्षांपूर्वी सद्भावना, चांगले हेतू आणि मैत्रीच्या भावनेतून सिंधू जल करार केला होता. मात्र गेल्या साडेसहा दशकांत पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादली आणि हजारो दहशतवादी हल्ले करून या कराराच्या भावनेचा भंग केला. पाकिस्तानप्रायोजित दहशतवादी हल्ल्यांमध्ये हजारो भारतीयांचा बळी गेला आहे. त्यामुळे अखेर भारताला हे जाहीर करावे लागले की, जोपर्यंत दहशतवादाचा जागतिक केंद्र असलेला पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार निलंबित राहील.”
पाकिस्तानला आत्मपरीक्षणाचा सल्ला देत ते म्हणाले “पाकिस्तानने कायद्याच्या राजवटीबाबत आत्मचिंतन करावे. २७ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सशस्त्र दलांना घटनात्मक बंड करण्याची परवानगी कशी दिली आणि आपल्या संरक्षण दलांच्या प्रमुखाला जन्मभरासाठी कायदेशीर संरक्षण कसे दिले, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा.” भारताने ही टिप्पणी पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने मंजूर केलेल्या २७ व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात केली आहे. या दुरुस्तीमुळे पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना आयुष्यभर कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळते.